दुसरे शीतयुद्ध :: पर्व पहिले ; भाग दुसरा.

ज्यांनी या आधीचा ब्लॉग वाचला नाही त्यांच्यासाठी, हा ब्लॉग अमेरिका व चीन दरम्यान सुरू असलेल्या ट्रेड वॉर बद्दल आहे. त्यालाच इथं दुसरं शीतयुद्ध असं म्हंटलं आहे.

मागील भागात आपण पाहिलं की कशाप्रकारे चीन व अमेरिका एकमेकांची कॉलर धरून उभे आहेत व्यापारयुद्धाच्या निमित्ताने,काय कारण आहे की ट्रम्प तात्यांनी हे व्यापारयुद्ध चालू केले आणि कशाप्रकारे हे व्यापारयुद्ध हे एक प्रकारे शीतयुद्ध आहे. मागील भाग वाचला नसेल तर किंवा पुन्हा विस्तृत वाचायचा असेल तर या लिंक वर क्लिक करून वाचू शकता.

https://dpmspeaks.wordpress.com/2018/09/22

या भागात प्रमुख तीन गोष्टी पहायच्या आहेत.

—–या युद्धात कशाप्रकारे भारत सामील आहे…?

—–युरोपियन युनियन काय करते आहे …?

—–काय काय परिणाम होतील या युद्धाचे…?

1. भारत कसा सामील आहे..?

जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था, जीडीपी ग्रोथ रेट जवळजवळ 8 टक्क्यांच्या घरात….जगभरातील व्यावसायिकांना व्यापाराची नवी दिशा देणारे आणि जगातील सर्वात तरुण व सुशिक्षित लोकसंख्या…एवढे प्रचंड आर्थिक सामर्थ्य असणारा आपला भारत. निश्चितच एक भावी महासत्ता आहेच. इथे अभिमानाचा एक क्षण येऊ पाहतोय आपल्यासाठी. ज्या इंग्रजांनी आपल्याला लुबाडून लुटून बरबाद केलं दीडशे वर्षात,केवळ सत्तर वर्षात त्यांच्या अर्थव्यवस्थेस मागं टाकण्यास आपण सज्ज आहोत. 2019 च्या शेवटापूर्वी हा नारळ फुटेलच.

तर असा हा आपला भारत. मोठ्या प्रमाणावर आपण निर्यात क्षमता वाढवली आहे आणि व्यापारी तूट भरून काढण्यासाठी आणखी वाढवावी लागेल. संकटं काय सांगून येतात का म्हणा,हे व्यापारयुद्ध…म्हणजे हे दुसरं शीतयुद्ध आपल्या या मार्गात एक मोठा अडथळा बनून बसलंय. ट्रम्प तात्यांनी स्टील व अल्युमिनियम वर टॅक्स वाढवला. आता भारत मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत स्टील आणि अल्युमिनियम पाठवतो,भारतासाठी हे फारच धोक्याचं झालं होतं. उत्तर द्यावच लागतं अशा वेळी. तब्बल 235 बिलियन डॉलर च्या 29 अमेरिकन आयातींवर भारताने टॅक्स वाढवला.

फार नव्हे,मार्च ते जून मधल्या गोष्टी आहेत या. परंतु या अशा ओढाताण करण्याने केवळ नुकसानच होणार हे समजदार भारत जाणून असल्यामुळे,या ट्रेड वॉर मध्ये भारताला न ओढण्याबाबत सतत प्रयत्न केले गेले भारत सरकारकडून.परंतु आता मात्र जेव्हा आपण त्या 29 अमेरिकन वस्तूंवरील टॅक्स 3 नोव्हेम्बर पर्यंतसाठी म्हणून पूर्वपदावर आले,अमेरिका भारतीय स्टीलला पुन्हा एकदा करमुक्त करणार हे जवळजवळ निश्चित आहे. एकंदरच भारताने अमेरिकेशी सलगी साधत या शीतयुध्दातून सहजपणे काढता पाय घेतला आहे. अतिशय समजदारीचे म्हणावे असे हे कौतुकास्पद पाऊल. बरं सहज म्हणून सांगतो,त्या 29 अमेरिकन वस्तूंवर,ज्यांचा व्यापार 235 बिलियन डॉलरचा होता,त्यातले 116 बिलियन डॉलरचे तर फक्त बदामच होते….!!!

भारताचे दुसरे कौतुकास्पद आणि जबरदस्त असे पाऊल म्हणजे कॉर्पोरेट मिनिस्ट्री ने अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे ज्यांची निर्यात आपल्याला केवळ या शीतयुद्धाची संधी साधून वाढवता येईल. याचंच एक उदाहरण म्हणजे,2012 मध्ये तेलबिया व खाद्यतेलाची निर्यात भारताने चीनकडे करणे थांबवले होते,ते आता पुन्हा सुरू झाले कारण अमेरिकन तेलबियांवर चीनने करवाढ केल्याने चीनी व्यापारी भारत व आफ्रिकेकडे वळले आहेत. भारताची या क्षेत्रातील निर्यात दुपटीने वाढण्याची चिन्हे आहेत. वरकरणी भारत फायद्यात दिसतोय.

पण याचा वाईट परिणाम होतोय प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परदेशी गुंतवणुकीवर. शांघाय पासून ते मुंबई पर्यंत सगळेच स्टॉक एक्सचेंज सध्या मंदावलेत. येत्या काळात भारतातील फॉरेन एक्स्चेंज रिझर्व्ह कमी होऊ शकतो. रुपयाच्या तुलनेत डॉलरचे महागणे हे त्यांचे एक मापक आहे.

नजीकच्या काळात मात्र फार मोठी हानी दिसत नाही भारतीय अर्थव्यवस्थेला. योग्य निर्णय घेतल्यास निर्यात नक्की वाढेल. “इंपोर्टेड” म्हणून मिरवणाऱ्यानी जरा सांभाळून खरेदी करावी, कारण एक आयफोन जेव्हा भारतीय बाजारात येतो तेव्हा तो बनला असतो अमेरिकेत, असेंबल होतो चीन मध्ये,त्याचे महत्वाचे स्पेअर पार्ट काही जपान व कोरियातुन येतात. म्हणजे या अशा काळात तो किती महाग होईल विचार करा..!!

2. युरोपियन युनियन ची काय भूमिका आहे…?

स्टील व अल्युमिनियम सह अनेक आयातींवर अमेरिकेने निर्बंध लावले असता मोठ्या प्रमाणात युरोपियन देशातील निर्यातकांवर नामुष्की ओढवली. एकंदर ट्रेड वॉर ही अशी गोष्ट आहे,सुरू कुणीही केली तरी उत्तर त्याच भाषेत देणे भागच असते. युरोपलाही नाईलाजास्तव यात यावे लागलेच. युरोपच्या कुठल्या विशिष्ट राष्ट्राबद्दल मी विस्तृतपणे सांगणार नाही,ब्लॉग उगाच मोठा होईल.

युरोपियन युनियन ने वर्ल्ड बँक, अमेरिकन सरकारपासून ते जमेल त्या सर्वांपर्यंत हे ट्रेड वॉर थांबवण्याचे प्रयत्न केले,मात्र असफल. साधारण जानेवारी पासून ते जूनपर्यंत ही कबड्डी खेळून झाल्यावर युरोपियन युनियन ने आपली चाल बदलली.

त्याबद्दल पुढे बोलण्याअगोदर मुद्दाम इथे सांगेन,दुसऱ्या महायुद्धात सर्वात जास्त झळ बसलेला हाच तो युरोप आहे. कुठेही युद्धाची झुळूक सुद्धा लागू न देण्यासाठी व अमेरिका वि. रशिया पहिल्या शीतयुध्दात सुरक्षित राहण्यासाठी म्हणून एकत्र आला. आजही जी पावलं युरोप टाकतय,समजदारीची वाटतात.

विसावी युरोपियन युनियन-चीन परिषद नुकतीच 16 जुलै ला चीन मध्ये बीजिंग शहरात पार पडली . त्यातील ठरावानुसार आता चीन व युरोपियन युनियन मिळून अमेरिकेच्या या आर्थिक हल्ल्याचा सामना करणार असं एकंदर ठरलं आहे. चीन व युरोपियन युनियन मिळून जगभरातील जीडीपीच्या एक तृतीयांश हिस्सा शेअर करतात,तेव्हा आता अमेरिकेस तोंडावर पाडण्याची तयारी या दोन महाशक्तींनी केलीच आहे.

3.) काय काय परिणाम होतील या युद्धाचे…?

हे दुसरे शीतयुद्ध सुरु होतानाच ट्रम्प तात्यांना वर्ल्ड बँकेने सूचित केले होते की असं नका करू,मोठी आर्थिक हानी होईल,पण ऐकेल ती अमेरिका कसली…? अमेरीकेच्या आर्थिक सुरक्षेसाठीचं निमित्त सांगून ट्रम्प तात्यांनी जगाच्या आर्थिक खच्चीकरणाची सुरुवात केलीये.

परिणाम व्हायला सुरू झालेत. तिसऱ्या तिमाहिच्या (quarter) अखेरीस चीनची निर्यातच काय, उत्पादन सुद्धा कमी झालंय. आशियातील,खास करून चीन मधील जवळजवळ सर्व स्टॉक मार्केट्स मध्ये मंदी आहे. चीनला 2025 पर्यन्त संशोधन क्षेत्रात उडी घेऊन मैदान गाजवायचं आहे, जगाला असली चायनीज तंत्रज्ञान देण्यासाठी चीनने कंबर कसली आहे. मात्र अशा परिस्थितीत त्याही गोष्टीवर विपरीत परिणाम होत आहे. चीन कर्ज देतो,तसेच तो कर्ज घेतोही तितक्याच मोठ्या प्रमाणावर. चीनच्या सावकारीचा हा आर्थिक बुडबुडा जराशा मंदीने सुद्धा फुटू शकतो. मंदी येऊ द्यायची नसेल तर मग चीनची निर्यात मंदावली नाही पाहिजे. युरो-चीन परिषदेत याविषयी काही आशेचे किरण दिसलेत.

भारताची निर्यात निश्चितच वाढेल. नजीकच्या काळात आपण या युद्धाचा फायदा घेऊन संधी साधणार हे नक्की. पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुका पाहता ही गोष्ट जास्त शक्य वाटते आहे. मात्र भारतातील परदेशी गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होईल असं सध्याचं चित्र आहे. शेअर बाजार मंदावेल,जीन्स पॅन्ट किंवा परदेशी ब्रँडचे इतर कपडे तसेच इलेक्ट्रिक साहित्य,महागड्या गाड्या,मोबाईल्स,लॅपटॉप्स व इतर स्मार्ट डिव्हाईस महाग होतील. रुपयाची घसरण डॉलरच्या तुलनेत वाढत जाईल.

चीन आपली अमेरिकेत बंद पडलेली निर्यात युरोपात वाढवून बॅलन्स करेलही. एकंदरच युरोपियन युनियनने सुद्धा सुरक्षात्मक धोरणाचा अवलंब केला आहे. तरीही युरोपात व्यापारी तूट वाढेल.

हेच चित्र जपान, कॅनडा,मेक्सिको व रशियाच्याही बाबतीत आहे.

अमेरिकेत भविष्यात आर्थिक तूट म्हणजेच ट्रेड डीफिसीट वाढेल असं चित्र आहे. कारण आज जर कच्चा माल महाग भेटत असेल तर उत्पादन खर्च वाढेल आणि निर्यात घटेल.

एक गोष्ट मात्र सगळीकडे सारखी आहे,ती म्हणजे सामान्य व्यापारी आणि सामान्य ग्राहकाची नाहक आर्थिक गळचेपी. या शीतयुद्धात कोण जिंकेल माहिती नाही,मात्र सामान्य व्यापाऱ्याने व ग्राहकाने हे युद्ध हरलंय, तेही या युद्धात प्रत्यक्ष सहभाग नसताना…!!

—-////——–////////————

हे पर्व इथं समाप्त होत आहे. याच विषयावर ताज्या माहितीसह नवीन पर्व जानेवारी 2019 मध्ये प्रकाशित होईल. त्यात एकूण 3 ते 4 ब्लॉग्ज असतील.

पुढील ब्लॉग सिरीज येतेय 18 नोव्हेम्बर ला….या ब्लॉग सिरीज चं नाव असेल “विंटर इज कमिंग”. सहा ब्लॉग्ज ची ही सिरीज असेल. त्याबद्दल अधिक माहितीसाठी माझा हा ब्लॉग पहा या लिंक वर जाऊन.

https://wp.me/p9AbUv-z

तोपर्यंत या ब्लॉग्जना जास्तीत जास्त शेअर करा,कमेंट करा व लाईक सुद्धा करा.

Warm Regards,

Dnyanesh Make “the DPM”

Whatsapp No. :- 9028482879

Email ID :- dpm8055@gmail.com

Advertisements

दुसरे शीतयुद्ध :: पर्व पहिले ; भाग पहिला

शीतयुद्ध म्हणजे दोन मोठ्या देशांमधील राजकीय आणि आर्थिक तणावाची अशी परिस्थिती ज्यात दोन्हीकडून समोरच्याला शस्त्राविना घायाळ करण्याचे आर्थिक आणि राजकीय प्रयत्न (थोडक्यात कारस्थानं) केले जातात.

शीतयुद्ध एकदा होऊन गेलं या जगात. थोडं थोडकं नव्हे तर तब्बल 46 वर्षे..!! बरेचदा लोक त्या शीतयुद्धाचे दोन भाग करतात पण तसं खर तर नाही. अमेरिका आणि रशिया 1991 पर्यंत साम्यवाद आणि भांडवलशाही वरून एकमेकांची कॉलर धरूनच होते. जग तेव्हा अणूयुध्दाच्या सावटाखाली होतं.

मग आता काय झालंय…??

या जगात एक नवी महासत्ता येऊ पाहतेय.(उफाळून आलेली देशभक्ती बाजूला ठेवा मी चीनबद्दल बोलतोय. आपल्याला अजून वेळ आहे.)

डोनाल्ड ट्रम्प उर्फ तात्या स्वतः म्हंटलेत की चीनने अमेरिकेचा 500 बिलियन डॉलर चा व्यापार एका वर्षात चोरला. एकंदर सर्व बाजूने आपल्या तोडीस तोड जगात कुणी उभं राहतंय हे अमेरिकेला तेव्हाही बघवलं नाही आणि आताही बघवत नाहीये.

दुसरीकडे चीन,प्रचंड बलाढ्य झालेला…सगळीकडे सगळ्या क्षेत्रात यशस्वी घोडदौड चालूच. जीडीपी तर पाच वर्षात अमेरिकेला मागे टाकेल इतका जबरदस्त. निर्यातीत सगळ्यात पुढे. विकासात आदर्श. अर्थकारण वाखाणण्याजोगे. सगळंच कसं भव्यदिव्य. पण वाढ मात्र आता कमी होत चाललीये अर्थव्यवस्थेची. उत्पादन इतकं झालंय की घ्यायला कुणी नाही. मग जगात इतर देशांमध्ये निर्यात करूया. मग दक्षिण चिनी समुद्रात अमेरिका डोळे वटारून उभा असताना कसे जातील जहाज…?? मदतीला धावून आला परममित्र पाकिस्तान. “चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर” मधून अरबी समुद्र गाठला तर सहज शक्य. सध्याला हे चीन-पाकच्या सुखी संसाराचं रुखवत 40% पूर्ण झालंय. चीन आपल्या ध्येयाच्या जवळ आहे. शिवाय “वन बेल्ट वन रोड “ या चीनच्या मोठ्या आंतरराष्ट्रीय निर्यात प्रकल्पात तब्बल 60 देश सहभागी झालेत. चीनने आशिया तर जिंकलाच. आफ्रिकेत सुद्धा अनेक देशात कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक करून रस्ते, रेल्वे इ. बांधणे चालूच आहे.

आता अमेरिकेसमोर प्रश्न पडला, कोण रोखणार हे वादळ…??

शेवटी तात्यांच्या “सुपीक” डोक्यातून आयडिया निघालीच.अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या चीनी सोलर पॅनल्सवर या जानेवारी मध्ये आयात कर वाढवलाच. पण काहि खास नुकसान झालं नाही म्हणा. 6 जुलैपर्यंत हे प्रयत्न चालू राहिले, शेवटी प्रोसेसर चिप वर आयात कर वाढवून चीनला धक्का दिलाच. चीनने सुद्धा मग कार व इतर अनेक अमेरिकन वस्तूंवर करवाढ केली. करोडो डॉलर्सचा व्यापार बुडाला. हे सत्र अजूनही चालूच आहे. याला व्यापार युद्ध म्हणतात.

पण आठवतंय का शीतयुद्धाची व्याख्या वर काय दिली आहे..? परत वाचा…!!

इथे एकमेकांचं आर्थिक खच्चीकरण चालू आहे. म्हणून हे पण एक शीतयुद्धच आहे. “अलीबाबा” चे सर्वेसर्वा जॅक मा म्हणतात हे वीस वर्षे चालेल…!!

पुढील भागात…::

—- भारत यात कसा सामील आहे..?

—–युरोपियन युनियन व रशियाचा काय संबंध आहे..??

—-काय काय परिणाम होतील या शीतयुद्धाचे…??

3 ऑक्टोबर 2018 रोजी पुढील भाग येईल.

— Information Compilation and Analysis by Dnyanesh Make “the DPM.”

Warm Regards